Wednesday, December 22, 2010

परफेक्ट कॉम्बिनेशन.....

साधारण मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. लग्नाला गेलो होतो. वडिलांच्या मित्राच्या मुलीच लग्न होत. लग्न तस जवळचच होत म्हणून जाव लागल. दुपारी १२ च्या सुमारास हॉल वर आलो. फॅमिलीसाठी दुसऱ्या रांगेतली जागा पकडली. पाहिल तर वेटर पाण्याचे ग्लास घेवुन फिरत होते. त्यांच्याकडून पाणी घेतल आणि शांतपणे खुर्चीवर बसलो. काकांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी बऱ्यापैकी खर्च केला आहे हे हॉलकडे पाहुनच कळल.

मंगलाष्टके सुरु होणार होती. मी इकडे तिकडे कोणी ओळखीच आहे का ते पाहत होत. सहजच माझ लक्ष आमच्या पाठच्या रांगेतील एका मुलीकडे गेल. आई बरोबर आली होती ती. खुप सुंदर होती दिसायला अस नाही. पण माझ लक्ष तिने वेधून घेतल एवढ नक्की. साधी सिंपल पण मनाला कुठेतरी भिडणारी. आई बरोबर होती म्हणून जास्त पाहता नाही आल मला तिच्याकडे.
तेवढ्यात मंगलाष्टके सुरु झाली. आता तिच्याकडे पाहता येण शक्य नव्हत. तिच्याकडे पाहत वधुवरांवर अक्षता टाकण कठीण काम होत. म्हणून मंगलाष्टके संपेपर्यंत शांत बसलो.

वधुवरांवर अक्षता टाकत असताना सहजच माझ लक्ष स्टेज वर उभ्या असलेल्या मुलींकडे गेल. त्यातली एक मुलगी एवढी  सुंदर होती की पहातच राहिलो मी. गुलाबी रंगाची नक्षीकाम केलेली low -waist  साडी तिने घातली होती. किती मेकअप केला होता तिने माहीत नाही. पण लय भारी दिसत होती. स्टेज वरती लग्न उरकल्या नंतर तिने स्वतःच फोटोशूट सुरु केल. फोटोग्राफर काकांकडून तिने वेगवेगळया पोज मध्ये फोटो काढून घेतले. आणि कोण तिला नाही म्हणेल हो. स्वतःच्या बहिणीच ही फोटोशूट तिने करून घेतल. तिची अदा, तिचे चेहर्यावरचे हाव भाव, तिच्या पोजेस पाहून मला दोन मिनिटे हसायला आल. (हसायला आल म्हणजे ती काही हसण्यासारख करत होती म्हणुन नव्हे तर तिला स्वतः मध्ये गुंतलेल पाहून) पण तिच्या वरून नजर काही हटत नव्हती. तिला ही थोड्या वेळाने कळल की आपल्याकडे कोणतरी पाहत आहे. तिने एक ओझरती नजर माझ्यावर टाकली आणि काही झालच नाही असा भाव चेहर्यावर आणून फोटोशूट मध्ये मग्न झाली. (मुलींची ही अदा तर वेड़ लावणारी असते हो) पण मी ही कसला सोडतोय. तीच फोटोशूट पूर्ण होई पर्यंत मी तिथेच बसून होतो. थोड्या वेळा पूर्वी ज्या मुलीला आई सोबत पाहिल होत तिला मी कुठेतरी विसरलो होतो.

थोड्या वेळाने एक मित्र भेटला. त्याच्याशी गप्पा मारत बसलो. नंतर आम्ही दोघे आणि त्याचा एक मित्र असे तीन जण लंच साठी गेलो. जेवत असताना ह्या बाई तिथे आल्या कोणाला तरी शोधत. मित्राला बोललो भारी दिसते राव ही. त्यावर मित्र बोलला.....केवढा मेकअप केला आहे म्हणून सुंदर दिसत आहे. त्याच ही बरोबर होत म्हणा. पण काही असो. सुंदर होती एवढ खर. जेवण संपवल आणि बाहेर आलो सिगरेट मारायला. मित्र बराच वेळ त्याच्या ex -girlfriend विषयी सांगत होता. बाहेरच काम उरकल्यावर मी परत हॉल मध्ये आलो.

नंतर वडील, मी, काका आणि वडिलांचे काही मित्र गप्पा मारत बसलो होतो. ज्यांच्या मुलीच लग्न होत ते काका ही आमच्या सोबत बसले होते. थोड्या वेळाने मी त्या गुलाबी साडी वालीला आमच्याकडे येताना पाहिल. तीच नाव काही मला शेवट पर्यंत काढता आल नाही. पुन्हा एकदा आमची नजर भेट झाली. ती जवळ आली आणि तिने काकांना स्टेज वर येण्यास सांगितल. पण तिचा आवाज काही मला आवडला नाही. थोडा गावंढळ, थोडा घोगरा असा काही तरी तिचा आवाज होता. नंतर कळल की ती मुंबई ची नव्हती. तेंव्हा अस वाटल की जेवढी सुंदर आहे दिसायला तेवढा आवाज ही सुंदर असता तर.

नंतर सहजच एक विचार मनात येउन गेला की आपल्याला किती गोष्टी परफेक्ट लागतात. मुलगी दिसायला सुंदर असली तर तिचा आवाज ही सुंदर असावा, आवाज सुंदर असला तर स्वभाव ही चांगला असावा. ही अपेक्षांची यादी कधी संपणार नाही. शेवटी compromise कराव लागतच. सुंदरते साठी स्वभाव आणि स्वभावासाठी सुंदरता. खुप कमी वेळा आयुष्यात परफेक्ट कॉम्बिनेशन मिळत. जस आहे तस एक्सेप्ट करायला आपण शिकलो तर आयुष्य खुप सुंदर आहे.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत 

1 comment:

  1. good one...just to tell u guys fall for good looks only and not for good nature...

    ReplyDelete