Sunday, February 20, 2011

Quote 9

वक़्त तो मरने तक साथ रेहता है
साली जिंदगी धोका दे जाती है.

अभिजीत

Saturday, February 12, 2011

तिच्या नकारात सुद्धा होकार आहे.....

व्हेलेन्टाइन डे. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. गारठलेली सकाळ, रम्य सायंकाळ, प्रेमाची मुक्त उधळण करणारा हा दिवस. प्रेम व्यक्त करण्यासाठी तसा कुठलाही दिवस चांगलाच की हो. पण ह्या दिवशी प्रेम व्यक्त केल तर आपल्याला विसर पडत नाही तारखेचा. कारण १४ फेब्रुवारी ही तारीख कोण विसरणार??? आपल्या प्रेयसीला तारखा लक्षात ठेवण्याची खुप घाणेरडी सवय असते. तिच्या अशा प्रश्नांपासून तुम्हाला वाचायचे असेल तर असे लक्षात राहणारे दिवस निवडा. तीही खुश आणि तुम्हीही खुश. असो.

ज्या मुलीवर आपल प्रेम आहे, तिच्या सोबत हा दिवस सेलिब्रेट करण म्हणजे एक स्वप्न च जगण आहे. एका अशाच मुली बद्दल आज मी बोलणार आहे. साधारण एक वर्षा पूर्वी मी जॉब ला होतो. एका प्रोजेक्ट वर १८ - २० जणांची एक टीम तयार करण्यात आली होती. ह्या टीम मध्ये ती सुद्धा होती. रोज सकाळी मीटिंग रूम मध्ये आम्हाला बोलवल जायच. दिवस भराच काम सांगितल जायच. आम्ही शोर्ट डेडलाइन वर काम करत होतो म्हणून बनवलेल शेड्यूल काही झाल तरी सांभाळण गरजेच होत. एकंदरीत वेळ कमी होता, काम जास्त होत. एकमेकांशी बोलायलाही वेळ नसायचा. पण तरीही काय झाल मला माहीत नाही. तिला पाहता क्षणीच अस वाटल की हीच ती.

तिच्या बद्दल बोलायच झाल तर. आपल्याच विश्वात राहणारी ती. काम काही जास्त करायला आवडायच नाही तिला. लग्नानंतर जॉब सोडणार होती ती. स्वभावाने तशी शांत पण कधी कधी अग्रेसिव. पाहता क्षणीच प्रेमात पडलो होतो मी. दिसायला सुंदर, पाणीदार डोळे, त्यावर कोरलेल्या भुवया, छोटस नाक, नाजुक ओठ. नेहमी जीन्स आणि टॉप मध्ये असायची, कधीतरी पंजाबी ड्रेस असायचा. वाचनाची आवड, नेहमी बैग मध्ये एक पुस्तक असायच. केस नेहमी घट्ट बांधलेले. जास्त नटायला, थटायला आवडायच नाही तिला. पण जशी होती तशी खुप सुंदर होती राव. डोळे एवढे बोलके आणि सुंदर की तासनतास बघत रहाव तिच्याकडे.

फिरायला खुप आवडत तिला. फोटोंच कलेक्शन आहे तिच्याकडे. तिच्या डेस्क वर जायचो तेंव्हा नेहमी कुठलेना कुठले फोटो दाखवत असायची मला. फोटो कोण पाहत होतो हो. तिला पाहता याव, तिच्याशी बोलता याव म्हणून मी जायचो तिच्या डेस्क वर. दिवसभर खुप काम असायच पण तरीही वेळ काढून जायचो तिच्याकडे. तिच्याशी बोलताना आपोआप फ्रस्ट्रेशन निघून जायच. कामाचा तणाव कमी व्हायचा. खुप वेळा अस वाटायच की तिला कुठे तरी भेटाव. तिच्याशी बोलाव. एक चांगला वेळ तिच्यासोबत घालवावा. तिला मनोसक्त बघत रहाव, ऐकत रहाव. पण काम एवढ असायच की वेळ काढण कठीण होत. आणि तिला अस डायरेक्ट विचारणार तरी कस. तिची काय प्रतिक्रिया असेल हे माहीत नव्हत.

मला नेहमी अस वाटायच की मला ज्या फीलिंग आहेत तिच्या बद्दल ते तिला माहीत असेल. तिलाही माझ्या बद्दल थोड्फार का होइना वाटत असेलच की. पण कधी तिने हे दाखवण्याचा प्रयत्न नाही केला किंवा तिचे प्रयत्न मला कळले नाहीत किंवा समजुन सुद्धा मला त्या वेळेस तो क्षण हेरता आला नाही. एकदा तिला वोडाफोनच बिल भरायच होत. तिने मला विचारल की येतोस का माझ्यासोबत. पण ऑफिसच्या वेळात काम सोडून मला तिच्या सोबत नाही जाता आल. एखाद वेळेस तो क्षण मी गमावला, ज्यात फ़क्त ती आणि मी असतो. बोलण फ़क्त तीच आणि माझ असत. तो वेळ आमचा असता. एखादा क्षण हेरण खुप कठीण असत हो.

कालांतराने प्रोजेक्ट संपला. माझा शेवटचा दिवस होता ऑफिस मध्ये. त्या दिवशीही मला नाही वेळ काढता आला तिच्यासाठी. नंतर एक दिवस मी तिला सांगितल की तू मला आवडतेस. त्या वेळेस तिने मला विचारल होत की प्रेम म्हणजे काय??? प्रेमाची परफेक्ट व्याख्या मला आजही नाही माहीत. भावनांना मी फ़क्त शब्दात नाही मांडू शकलो. तिच्या नकारात सुद्धा होकार आहे. हे तिलाही माहीत आहे आणि मलाही.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Tuesday, February 8, 2011

कशाला एवढी दुनियादारी करता?????

हल्ली फेसबुक मुळे ऑरकुटच प्रस्थ फार कमी झाल आहे. बहुतेक सर्वचजण ऑरकुट सोडून फेसबुक वर असतात. बर्यापैकी प्रायव्हसी जपली जात आहे म्हणून खुप कमी कालावधीत फेसबुक सर्वांच लाडक झाल आहे. इथेही कोट्स अपडेट केले जातात, म्हणजे इमोशनल कोट्स, लव कोट्स, फ्रेंडशिप कोट्स रोजच्या रोज अपडेट केले जातात. तुम्ही जर खरच मनापासून मानत असाल हे कोट्स आणि त्यांचा अर्थ तर खुप चांगल आहे हो. पण लोकांना फ़क्त दाखवण्यासाठी करत असाल तर थांबवा रे. कारण तुम्ही मानतच नसाल तर कशाला लिहिता रे. समजा एखादा कोट तुम्हाला खरच आवडला, त्यातला अर्थ तुम्हाला पटला, तुम्हाला तो सर्वांसोबत शेअर करावसा वाटला तरच करा हो. नाही तर कशाला ही दुनियादारी करता...थांबवा की.

खुप वेळा अर्थ नसलेल्या ओळी फेसबुक वर पब्लिश केल्या जातात. विषय कुठलाही असू शकतो म्हणजे जॉब, मैत्री, प्रेम, आयुष्य, रूटीन लाइफ. पण तुम्ही ती ओळ वाचली तरी तुम्हाला कळेल काय फालतुगिरी आहे. आणि ह्यावर कहर म्हणजे त्या ओळी वर १५-२० कमेंट्स दिल्या जातात. थांबवा की हे सर्व. मला कधी कधी प्रश्न पडतो की ह्या सर्वातुन नक्की काय साध्य करायच असत लोकांना. काही चांगली वाक्य पब्लिश करा रे. त्यावर कमेंट्स देयला आम्हाला ही आवडेल की हो. असो.

गेल्या काही दिवसात मी एवढे फ्रेंडशिप कोट्स, लव कोट्स, इमोशनल कोट्स वाचले असतील की काही विचारू नका. मी काही व्यक्तींनी लिहिलेल्या अशा कोट्स वर कमेंट्स सुद्धा दिल्या की खुप भारी लिहिल आहेस. आवडल वगैरे. त्यावर त्यांचा रिप्लाय असा होता की, नाही रे, अस काही नाही. इट्स जस्ट अ कोट. म्हंटल व्वा, काय रिप्लाय आहे. ओके बोलून सोडून दिल. अशा व्यक्तिंशी तुम्ही अर्ग्युमेंट तरी काय करणार??? सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनायच असत बाकि काही नाही.

साधे फोटो अपलोड केले जातात. फोटो कसा ही असो, सुंदर आहे, छान आहे बोलून आपण मोकळे होतो. किती डिप्लोमेट राहणार आहात. एखादी मुलगी आवडते तुम्हाला तर बोला की तिला सरळ.....तू आवडतेस म्हणून. दरवेळेस घुमुन फिरुनच सांगायची काय गरज आहे??? असो.

माझ एवढच सांगण आहे की जे काही कराल ते मनापासून करा. दुनियादारी पासून स्वतःला दूर ठेवा. सर्वात महत्वाच म्हणजे आयुष्य एन्जॉय करा. 

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Tuesday, February 1, 2011

सर्वकाही सोडल प्रेमाखातिर.....

मागच्या वर्षी घटस्थापनेला मी महाड ला (माझे गाव) गेलो होतो. देव बसवयाचे असतात म्हणून दर वर्षी फॅमिली सोबत जातो. आज ही ते घर पूर्वीच्या घरां सारख आहे. कौलारू, घराच्या भिंती, अंगण शेणाने सारवलेल, जेवण आजही चुलीवर होत. घरात काही नविन आल असेल तर टेलीफोन आणि गैस सिलेंडर आला आहे. मला देवघर पहायला फार आवडत. घटस्थापनेच्या दिवशी काका देवघरात फुलांची आरास करतात. गेली कित्येक वर्ष एका खास प्रकारच्या फुलांनिच देवघर सजवल जात आहे. जेंव्हा उन्हाच कवडस देवघरात पडत तेंव्हा खुप सुंदर दिसत देवघर. घरातली कुठली माझी आवडती जागा असेल तर ती देवघरच आहे. घट बसले की काकी आम्हाला जेवायला वाढतात. गावच्या जेवणात चपाती हा प्रकार नसतो. भात, वरण, भाजी , पापड़ आणि लोंच एवढ साध जेवण असत. भात सुद्धा हलका गुलाबी रंगाचा असतो. (काकांची भाताची शेती आहे म्हणून भात डायरेक्ट घरातच येतो) आपण मुंबईत जो भात खातो तो खुप पोलिश केलेला असतो म्हणून तो पांढरा शुभ्र असतो. जेवण उरकल की आम्ही मामा मामी कडे येतो. एक दिवस त्यांच्याकडे राहतो आणि दुसरया दिवशी घरी येयला निघतो.

दुसरया दिवशी घरी येयला निघण्याच्या काही तास अगोदर घडलेला एक प्रसंग मी तुमच्या सोबत शेअर करत आहे. मामा ज्या वाडीत राहतो तिथे सर्व आमचीच माणसे राहतात. एकदा का गावाला गेलो की सर्वांकडे जाव लागत. मामाकडे रहायला आलो असलो तरी सकाळी नाष्टयासाठी बाजूच्याच एका घरातून आम्हाला बोलावण आल. गावाकडे पुष्कळदा ठरलेला नाश्ता असतो तो कांदेपोहे. पण कांदेपोहे म्हंटल की मला आठवण येते ती महाड मध्ये रहाणारया माझ्या एका दुसरया मामीची. एवढे भारी कांदेपोहे ती बनवते की मी चाहता आहे तिच्या कांदेपोह्यांचा. हे तिला सुद्धा माहीत होत. मी लहान असताना त्यांच्याकडे जेंव्हा जायचो तेंव्हा त्या आवर्जुन कांदेपोहे बनवायच्या. लहानपणी खाललेल्या कांदेपोह्यांची चव आजही जिभेवर आहे. तसेच माझी आजी (म्हणजे आईची आई) खुप सुंदर वाटाण्याची उसळ बनवायची. मी गावी आल्यावर खास आवर्जुन माझ्यासाठी बनवायची. ते खाल्लेले कांदेपोहे, ती वाटाण्याची उसळ आजही मनात कुठेतरी घर करून आहे. बोलत बसलो तर हे विषय कधी संपणार नाहीत, मूळ विषयाकडे येतो.

सकाळ चा नाश्ता झाला. गावात फेरफटका मारून झाला. नेहमीच्या ठिकाणी कोल्ड्रिंक, लस्सी मारून झाली. घरी आलो. जेवण झाल्यावर आम्ही घरी येयला निघणार होतो. टी.व्ही. बघत बसलो होतो. तेवढ्यात आई ची मैत्रिण आणि तिच्यासोबत एक मुलगी आली. नंतर मला कळल की ती मुलगी आईच्या मैत्रिणीची सुन होती. दोन मैत्रिणी खुप वर्षांनंतर भेटल्या होत्या. त्यांच्या गप्पा चांगल्या रंगल्या होत्या.

ही मुलगी शांत बसली होती. वयाने १८ असेल फार फार. आपल्या मुंबईचीच राहणारी होती ती. आईच्या मैत्रिणीचा मुलगा सुट्टीत मुंबई ला येयचा तेंव्हा त्याची हिच्याशी ओळख झाली. ओळखीच रूपांतर प्रेमात झाल आणि कालांतराने त्यांनी लग्न केल. पण मला थोड आश्चर्य वाटल. मुंबई सारख्या ठिकाणी राहणारी मुलगी. नुकतीच कॉलेज ला जायला लागली होती. खरतर आयुष्य एन्जॉय करण आता सुरु झाल होत. ह्याच वेळेस तिला प्रेम झाल आणि तिने लग्न केल. वयाच्या १८ व्या वर्षी तिची ही कमिटमेंट खरच वाखण्या जोगी आहे. आजकाल मुली २७ व्या, २८ व्या वर्षी तरी एवढ्या कमिटेड असतात का??? करीअर, पैसा ह्या दुनियादारित अडकून बसलेल्या आहेत. शेवटी काय हो लग्न करण्यासाठी पैसा गरजेचा आहे, प्रेम नाही.

ह्या मुलीने सर्वकाही सोडल प्रेमाखातिर. तुम्ही बोलाल की तिला अक्कल नाही, डोक नाही. बरोबर आहे तुमच. तिला डोक नाही. तिने जे काही केल ते मनापासून केल. जे प्रेम केल तेहि मनापासून केल. कालांतराने सर्वकाही चांगलच होइल की हो. प्रेम होण आणि निभावण कठीण असत. बाकीच्या गोष्टी आपोआप होवून जातात की हो.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत