Saturday, February 12, 2011

तिच्या नकारात सुद्धा होकार आहे.....

व्हेलेन्टाइन डे. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. गारठलेली सकाळ, रम्य सायंकाळ, प्रेमाची मुक्त उधळण करणारा हा दिवस. प्रेम व्यक्त करण्यासाठी तसा कुठलाही दिवस चांगलाच की हो. पण ह्या दिवशी प्रेम व्यक्त केल तर आपल्याला विसर पडत नाही तारखेचा. कारण १४ फेब्रुवारी ही तारीख कोण विसरणार??? आपल्या प्रेयसीला तारखा लक्षात ठेवण्याची खुप घाणेरडी सवय असते. तिच्या अशा प्रश्नांपासून तुम्हाला वाचायचे असेल तर असे लक्षात राहणारे दिवस निवडा. तीही खुश आणि तुम्हीही खुश. असो.

ज्या मुलीवर आपल प्रेम आहे, तिच्या सोबत हा दिवस सेलिब्रेट करण म्हणजे एक स्वप्न च जगण आहे. एका अशाच मुली बद्दल आज मी बोलणार आहे. साधारण एक वर्षा पूर्वी मी जॉब ला होतो. एका प्रोजेक्ट वर १८ - २० जणांची एक टीम तयार करण्यात आली होती. ह्या टीम मध्ये ती सुद्धा होती. रोज सकाळी मीटिंग रूम मध्ये आम्हाला बोलवल जायच. दिवस भराच काम सांगितल जायच. आम्ही शोर्ट डेडलाइन वर काम करत होतो म्हणून बनवलेल शेड्यूल काही झाल तरी सांभाळण गरजेच होत. एकंदरीत वेळ कमी होता, काम जास्त होत. एकमेकांशी बोलायलाही वेळ नसायचा. पण तरीही काय झाल मला माहीत नाही. तिला पाहता क्षणीच अस वाटल की हीच ती.

तिच्या बद्दल बोलायच झाल तर. आपल्याच विश्वात राहणारी ती. काम काही जास्त करायला आवडायच नाही तिला. लग्नानंतर जॉब सोडणार होती ती. स्वभावाने तशी शांत पण कधी कधी अग्रेसिव. पाहता क्षणीच प्रेमात पडलो होतो मी. दिसायला सुंदर, पाणीदार डोळे, त्यावर कोरलेल्या भुवया, छोटस नाक, नाजुक ओठ. नेहमी जीन्स आणि टॉप मध्ये असायची, कधीतरी पंजाबी ड्रेस असायचा. वाचनाची आवड, नेहमी बैग मध्ये एक पुस्तक असायच. केस नेहमी घट्ट बांधलेले. जास्त नटायला, थटायला आवडायच नाही तिला. पण जशी होती तशी खुप सुंदर होती राव. डोळे एवढे बोलके आणि सुंदर की तासनतास बघत रहाव तिच्याकडे.

फिरायला खुप आवडत तिला. फोटोंच कलेक्शन आहे तिच्याकडे. तिच्या डेस्क वर जायचो तेंव्हा नेहमी कुठलेना कुठले फोटो दाखवत असायची मला. फोटो कोण पाहत होतो हो. तिला पाहता याव, तिच्याशी बोलता याव म्हणून मी जायचो तिच्या डेस्क वर. दिवसभर खुप काम असायच पण तरीही वेळ काढून जायचो तिच्याकडे. तिच्याशी बोलताना आपोआप फ्रस्ट्रेशन निघून जायच. कामाचा तणाव कमी व्हायचा. खुप वेळा अस वाटायच की तिला कुठे तरी भेटाव. तिच्याशी बोलाव. एक चांगला वेळ तिच्यासोबत घालवावा. तिला मनोसक्त बघत रहाव, ऐकत रहाव. पण काम एवढ असायच की वेळ काढण कठीण होत. आणि तिला अस डायरेक्ट विचारणार तरी कस. तिची काय प्रतिक्रिया असेल हे माहीत नव्हत.

मला नेहमी अस वाटायच की मला ज्या फीलिंग आहेत तिच्या बद्दल ते तिला माहीत असेल. तिलाही माझ्या बद्दल थोड्फार का होइना वाटत असेलच की. पण कधी तिने हे दाखवण्याचा प्रयत्न नाही केला किंवा तिचे प्रयत्न मला कळले नाहीत किंवा समजुन सुद्धा मला त्या वेळेस तो क्षण हेरता आला नाही. एकदा तिला वोडाफोनच बिल भरायच होत. तिने मला विचारल की येतोस का माझ्यासोबत. पण ऑफिसच्या वेळात काम सोडून मला तिच्या सोबत नाही जाता आल. एखाद वेळेस तो क्षण मी गमावला, ज्यात फ़क्त ती आणि मी असतो. बोलण फ़क्त तीच आणि माझ असत. तो वेळ आमचा असता. एखादा क्षण हेरण खुप कठीण असत हो.

कालांतराने प्रोजेक्ट संपला. माझा शेवटचा दिवस होता ऑफिस मध्ये. त्या दिवशीही मला नाही वेळ काढता आला तिच्यासाठी. नंतर एक दिवस मी तिला सांगितल की तू मला आवडतेस. त्या वेळेस तिने मला विचारल होत की प्रेम म्हणजे काय??? प्रेमाची परफेक्ट व्याख्या मला आजही नाही माहीत. भावनांना मी फ़क्त शब्दात नाही मांडू शकलो. तिच्या नकारात सुद्धा होकार आहे. हे तिलाही माहीत आहे आणि मलाही.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

No comments:

Post a Comment